चार हजारांवर शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:54 AM2017-10-16T01:54:12+5:302017-10-16T01:54:58+5:30
वाशिम : शासनाकडून जाहीर झालेल्या पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्यांनी विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून वारंवार आवाहन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाकडून जाहीर झालेल्या पीक कर्जमाफीस पात्र शेतकर्यांनी विनाविलंब आपले बँक खाते आधारकार्डांशी लिंक करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, त्याउपरही सुमारे चार हजार शेतकर्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, असे संकेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने वर्तविले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक र्मया. अकोला बँकेचे कर्जमाफीस पात्र शेतकरी संख्या एकंदरित ७९ हजार १२८ असून, त्यापैकी ७५ हजार १७२ शेतकर्यांचे आधार कार्ड रीतसर बँक खात्यांशी लिंक करण्यात आलेले आहेत. उर्वरित चार हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांचे आधार कार्ड लिंक करुन घेणे आवश्यक आहे.
तथापि, ज्या शेतकर्यांचे आधार कार्ड अद्याप बँक खात्यांशी लिंक झाले नसेल, त्यांना कर्जमाफीकरिता काही अवधी लागू शकतो, याची नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीयीकृत, खासगी बँका, विदर्भ कोकण बँकेच्या पात्र सभासदांनीदेखील आधार कार्ड लिंक करुन घेणे आवश्यक आहे. संबंधित शेतकर्यांनी आपले आधार कार्ड सेतू सेंटर अथवा बँकेमध्ये जाऊन लिंक करावे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी त्वरित नवीन आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वाशिम यांनी केले आहे.