चार हजार विद्यार्थी देणार एमपीएससीची परीक्षा
By admin | Published: July 14, 2017 01:48 AM2017-07-14T01:48:52+5:302017-07-14T01:48:52+5:30
१६ जुलै रोजी वाशिम शहरातील अकरा परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० ते १२ वाजेदरम्यान एकूण ४१०४ परीक्षार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ही संयुक्त पूर्व परीक्षा १६ जुलै रोजी वाशिम शहरातील अकरा परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० ते १२ वाजेदरम्यान एकूण ४१०४ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या अकराही परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले.
सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी होणारी पूर्व परीक्षा ही वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस हायस्कूल, तुळशीराम जाधव महाविद्यालय, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, रेखाताई कन्या शाळा, शासकीय तंत्रनिकेतन व जवाहर नवोदय विद्यालय या अकरा परीक्षा केंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा केंद्रानावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील इंटरनेट, झेरॉक्स सेंटर, पानपट्टी सेंटर, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परीक्षा कालावधीत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाइल, सेल्युलर फोन, लॅपटॉप, फॅक्स, वायरलेस सेट, रेडिओ व इतर प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.