चौथ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन
By admin | Published: July 1, 2016 01:15 AM2016-07-01T01:15:59+5:302016-07-01T01:15:59+5:30
क्रांतिवीर लहुजीनगर विकास समितीअंतर्गत घरकुल लाभार्थींच्या विविध मागण्यासाठी आंदोलन काढण्यात आले.
वाशिम : स्थानिक सिव्हिल लाइन भागातील क्रांतिवीर लहुजीनगरमधील घरकुल लाभार्थींच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी क्रांतिवीर लहुजीनगर विकास समितीच्यावतीने अध्यक्ष संजय वैरागडे यांच्या नेतृत्वात सोमवार, २७ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या बेमुदत उपोषणाला चार दिवस झाले असून, उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची जिल्हा प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. उपोषणाच्या चौथ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. वाशिम शहरातील रहिवाशांच्या मालकी हक्काचे दस्तमध्ये तत्काळ दुरुस्ती करुन द्यावी. सदरहू दस्त देण्याकरिता विलंब करणारे व दिशाभूल करून चुकीचा दस्त बनविणारे मुख्याधिकारी व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. सदरहू दस्तामध्ये दुरुस्ती करून मालकी हक्काचा दस्त तातडीने देण्याचा आदेश व्हावा. क्रांतिवीर लहुजीनगरातील लाभार्थींकरिता कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. याकरिता टेम्पल गार्डनमधील विहिरीतून वीज मोटारपंप पाइपलाइनने पाणी घेण्याबाबत परवानगी मिळावी. तसेच क्रांतिवीर लहुजीनगर हे नाव वीज मीटर, मतदान ओळखपत्न, रेशनकार्ड, आधारकार्डमध्ये वापरात असल्याने त्याबाबत नगर परिषदने ठराव पारित करुन द्यावा, आदी मागण्यांच्या पूर्ततेकरिता २७ जूनपासून उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.