नोकरीच्या आमिषातून होऊ शकेल फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:23+5:302021-09-22T04:46:23+5:30
संतोष वानखडे वाशिम : आरोग्य विभागातील मेगा भरतीवरील निर्बंध उठविण्यात आले असून, २५ सप्टेंबर, १६ व १७ आॅक्टोबर रोजी ...
संतोष वानखडे
वाशिम : आरोग्य विभागातील मेगा भरतीवरील निर्बंध उठविण्यात आले असून, २५ सप्टेंबर, १६ व १७ आॅक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांची फसवणूक करण्याकामी दलाल मंडळी सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुणीही कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये, सतर्क राहावे, असा सल्ला जि. प. आरोग्य सभापतींनी दिला.
कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेचे महत्त्व अधोरेखीत झाल्याने आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी १५ आॅगस्टपर्यंत अर्ज मागविले होते. या पदांसाठी २५ सप्टेंबर रोजी परीक्षा होत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदांतर्गत येणा-या विविध पदांसाठीदेखील आॅक्टोबर महिन्यात परीक्षा होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ११३ पदे भरण्यात येणार आहे. यासाठी २०१९ मध्येच अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी अर्ज सादर करणा-यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात आलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर होती. दरम्यान, मेगा पदभरती लक्षात घेता नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करावे, नोकरी लावून देण्याचे कुणी आमिष दाखवित असेल तर सतर्क राहावे, असा सल्ला आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी दिला.
..................
कोट
आरोग्य विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया राबवली जात आहे. कोणी पैशाचे माध्यमातून नोकरी लावून देतो, असे सांगून लुबाडणूक करू शकतात. उमेदवाराने याला बळी पडू नये.
-चक्रधर गोटे
सभापती, शिक्षण व आरोग्य,
जि. प. वाशिम
.....
एकूण पदे ११३
परीक्षा : १६ व १७ आॅक्टोबर