१०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:59 PM2018-10-03T14:59:37+5:302018-10-03T15:00:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्यामार्फत चार महिने कालावधीचे मोफत पूर्वप्रशिक्षण घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांना बुधवारी प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण वाशिम येथे करण्यात आले.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एलआयसी आदी लिपिकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षकेच्या पूर्व तयारी करिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण वाशिम येथे गत दहा वर्षांपासून बार्टी व प्रसंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जात आहे. चार महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच मोफत पुस्तक संच वितरण सोहळा वाशिम येथे पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप पाटील तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, प्रसंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करीत आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी विनायक जाधव, मराठा सेवा संघाचे माधव बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते बालन तायडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. डॉ. गजपाल इंगोले यांनी या उपक्रमाची माहिती देत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करावे, असा सल्ला दिला. संचालन अमोल पाईकराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसंग संस्थेचे प्रकल्प समन्वयक संजय इंगोले, प्रसेनजित धडे, विनोद राऊत, अमोल बोरकर यांनी परिश्रम घेतले.