मोफत प्रवेश शुल्क परताव्याचा प्रश्न पेटला!
By Admin | Published: May 7, 2017 02:11 AM2017-05-07T02:11:36+5:302017-05-07T02:11:36+5:30
वाशिम जिल्ह्यातील स्थिती : ४४ शैक्षणिक संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात
वाशिम : शैक्षणिक हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांंना शाळेत प्रवेश देणार्या जिल्हयातील ४४ शाळांना सन २0१५ पासून शासनाकडून शुल्क परतावा मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित संस्थाचालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून सोमवार, ८ मेपासून साखळी उपोषणाचा निर्धार केला आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणार्या जिल्ह्यातील एकाही शाळेला गेल्या तीन वर्षांंपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ही रक्कम तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. तथापि, ज्यावर्षी विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून शाळेत मोफत प्रवेश दिला जातो, त्याचवर्षी शासनाकडून शुल्क परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कमालीची उदासिनता बाळगली जात असल्याचा आरोप शैक्षणिक संस्थाचालकांनी केला. २0१४-१५ मध्ये जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यात आला. त्यापोटी शासनाकडून ८0 लाख रुपये मिळणे बाकी आहे. २0१५-१६ मधील ही रक्कम एक कोटी रुपये असून २0१६-१७ मधील १.२५ कोटी रुपये शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप मिळालेले नाहीत. येत्या दोन दिवसात शुल्क परतावा न मिळाल्यास महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य शिक्षणाधिकारी, प्राथमिक यांचे कार्यालय व जिल्हा परिषदेवर लोकशाही पध्दतीने साखळी उपोषण करतील, असा इशारा संस्थाचालकांनी दिला आहे.
२५ टक्के प्रवेश शुल्काच्या परताव्याची तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम तीन वर्षांंपासून शासनाकडे थकली असतानाही जिल्ह्यातील संस्थाचालकांनी कुठलीच तक्रार न ठेवता विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक हित जोपासले. याचा सहानुभूतीपुर्वक विचार करून शासनाने ही रक्कम विनाविलंब संस्थाचालकांना अदा करावी, अशी अपेक्षा आहे.
- संतोष गडेकर
जिल्हाध्यक्ष, मेस्टा संघटना, वाशिम
२0१४-१५ मधील शुल्क परताव्याची ८१ लाख रुपये रक्कम प्राप्त झाली असून २0१६-१७ मधील २.१८ कोटी रुपयांच्या मागणीपैकी ५७ लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले. मध्यंतरी प्रस्तावांची छानणी, शाळा तपासणी यासह त्रुट्या दुर करण्याच्या कामामुळेच शुल्क परतावा देण्यास उशीर झाला. मात्र, येत्या आठवड्यात हा प्रश्न निकाली काढला जाईल.
- अंबादास मानकर
प्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम