कोरोनाकाळात २.२५ लाख गोरगरिबांना मोफत अन्नधान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:27+5:302021-05-11T04:43:27+5:30
वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी ...
वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील २.२५ लाख लाभार्थींसाठी ५० हजार क्विंटल धान्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. गतवर्षी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने केंद्र शासनाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने एका महिन्यासाठी मोफत धान्य देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून सुरू केली. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फेदेखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ४९ हजार ५०० क्विंटल धान्य उपलब्ध केले जाणार आहे.
०००
बॉक्स...
१२ दुकानांचे परवाने रद्द
जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने आहेत. यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेल्या दुकानांच्या लाभार्थींच्या शिधापत्रिका जवळच्या रेशन दुकानाला जोडण्यात आल्यामुळे कोणताही लाभार्थी हा धान्यापासून वंचित राहणार नाही, असा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे.
०००००
कार्डधारकांची एकूण संख्या २,२५,९२०
अंत्योदय ४८,२९३
प्राधान्य कुटुंब १७,७,६२७
००००००
मोफत धान्यासाठी लाभार्थींचा अंगठा नाही
कोरोनाकाळात ऑनलाइन पद्धतीने रेशनचे धान्य वितरित झाले तर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिने ‘ई-पॉस’वर केवळ संबंधित दुकानदाराचा अंगठा घेऊन लाभार्थींना धान्य वाटप केले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले.
०००००
कोट
जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने असून, यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे.
- सुनील विंचनकर
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम
००००
कोट
केंद्र शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या तांदळाचा कोटा कमी करून त्याऐवजी एखाद्या डाळीचा किंवा साखरेचा समावेश केला तर लाभार्थींसाठी ही बाब अधिक फायदेशीर ठरेल. धान्याचा दर्जा हा उत्कृष्ट असायला हवा.
-गौतम भगत
लाभार्थी