तीन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 04:34 PM2020-04-26T16:34:04+5:302020-04-26T16:34:29+5:30

जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी पुढाकार घेऊन १९ एप्रिलपासून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे.

Free health check-up of three thousand citizens | तीन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

तीन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भारतीय जैन संघटना जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने १९ एप्रिलपासून सुरू केलेल्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत २५ एप्रिलपर्यंततीन हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा व कृषीशी निगडीत सेवांना सुट देण्यात आली आहे. काही खासगी दवाखाने दिवसभर सुरू असतात तर काही खासगी दवाखाने दिवसभर सुरू नसतात. खासगी दवाखान्यांमध्ये तपासणीची वेळ सोयीनुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना ऐनवेळी उपचारापासून वंचित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही तसेच काही गोरगरीब रुग्णांकडे वेळेवर पैसे उपलब्ध नसल्यामुळे उपचारही मिळू शकत नाहीत. गरजूंना वेळेवर व मोफत उपचार मिळावे या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटना जिल्हा शाखा वाशिमचे प्रकल्प संयोजक शिखरचंद बागरेचा व सहप्रकल्प संयोजक बी.जे.एस. तथा जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी पुढाकार घेऊन १९ एप्रिलपासून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या कामी अनेक डॉक्टर व समाजातील दानशूरांनी सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून मदत दिली आहे. वाशिम शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची मोफत तपासणी व औषधी दिली जाते. यापूर्वी वाशिम शहरातील घाणमोडी, चामुंडा देवी परिसर, आनंदवाडी, वीर लहुजी नगर, निमजगा, भिमनगर, आनंदवाडी, ग्रामीण भागात कुंभारखेडा, केकतउमरा यासह अन्य भागात २८०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. २५ एप्रिल रोजी स्थानिक जनशिक्षण संस्थान परिसरात ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जवळपास २०० जणांची तपासणी व औषध वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, संयोजक शिखरचंद बागरेचा, सहसंयोजक तथा बी.जे.एस. चे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, पथक प्रमुख डॉ. सुजाता भगत, नितीन व्यवहारे, संजय भांदुर्गे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक केले.
 
यापुढेही आरोग्य तपासणीचा उपक्रम सुरू राहणार
लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांची आरोग्यविषयक तपासणी व औषधीसंदर्भात गैरसोय होऊ नये म्हणून हा उपक्रम लॉकडाउन व संचारबंदी लागू असेपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमातील चमू कार्यरत आहे, असे भारतीय जैन संघटना जिल्हा शाखा वाशिमने स्पष्ट केले.

Web Title: Free health check-up of three thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.