चाकोली येथे शुक्रवारी मोफत रुग्ण तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:13+5:302021-01-08T06:12:13+5:30
....................... गतिरोधक बसविण्याची मनसेची मागणी अनसिंग : वाशिम-अनसिंग मार्गावरील शेलू फाटा ते जागमाथा महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दिवसभर वाहने सुसाट ...
.......................
गतिरोधक बसविण्याची मनसेची मागणी
अनसिंग : वाशिम-अनसिंग मार्गावरील शेलू फाटा ते जागमाथा महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दिवसभर वाहने सुसाट वेगात धावत असतात. असे असताना या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी मनसेने मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
.........................
सायकलवारीत सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम : शहरातील सायकलप्रेमींच्या संकल्पनेतून वाशिम सायकलिस्ट फाउंडेशनची स्थापना १ जानेवारी रोजी करण्यात आली आहे. याअंतर्गत आगामी काही दिवसांत निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी शेगाव येथे सायकलवारी काढली जाणार असून, त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.........................
नर्सेस असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वाशिम : कोरोना काळात अहोरात्र परिश्रम करून नि:स्वार्थ भावनेने रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना अंशकालीन कर्मचारी घोषित करून आरोग्य सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी नर्सेस असोसिएशनने बुधवारी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
.......................
‘एनडीएमजे’ची जिल्हा कार्यकारिणी गठीत
वाशिम : नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एनडीएमजे) या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. त्यात अध्यक्षपदी समाधान सावंत, उपाध्यक्ष अरविंद भिसे, सचिव बालाजी गंगावणे, सहसचिव नारायण सरकटे, कोषाध्यक्ष महादेव कांबळे, संघटक रामदास वानखेडे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
..................
कलावंतांच्या विविध समस्या प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन समिती अद्याप स्थापन झालेली नाही. वृद्ध कलावंतांच्या अनुदानाचे प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडून आहेत. यासह इतरही अनेक समस्या प्रलंबित असून, याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त शाहीर संतोष खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
......................
विद्युतरोहित्र नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ
वाशिम : सध्या रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मोटारपंपांच्या स्टार्टरला ऑटो स्विच बसविले आहेत. यामुळे अधूनमधून खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एकाचवेळी अनेक मोटारपंप सुरू होऊन रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.
....................
नळांना मीटर बसविण्याचा प्रश्न अधांतरी
वाशिम : शहरातील सर्वठिकाणच्या नळांना मीटर बसवून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मध्यंतरी नगर परिषदेने घेतला होता; मात्र विविध अडचणींमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. हा प्रश्न अधांतरी रखडला असून पाणी वापराचे मोजमाप होणे अशक्य होत आहे.
....................
रोहयोतील कामांमध्ये गैरप्रकाराची तक्रार
तोंडगाव : रोजगार हमी योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यात झालेल्या कामांची चौकशी झाली. त्यात अनेकजण दोषी आढळले आहेत. त्याच धर्तीवर इतरही तालुक्यांमधील कामांमध्ये गैरप्रकार झाले असून चौकशी करण्याची मागणी तेजराव वानखेडे यांनी महसूल विभागाकडे मंगळवारी केली.
.................
वाहतूक नियम करताना पोलिसांची दमछाक
वाशिम : वाशिम जिल्ह्याची निर्मिती होऊन २२ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. असे असतना जिल्हा मुख्यालयी, वाशिम शहरात कुठेच सिग्नल व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. यामुळे वाहनांच्या गर्दीत उभे राहून वाहतूक नियमन करताना पोलिसांची दमछाक होत आहे.
...............
पीयूसी चाचणीचे दर अत्यल्प
मंगरूळपीर : वाहनांच्या पीयूसी चाचणीचे सध्याचे दर अत्यल्प असून ते वाढविण्याची मागणी पीयूसी सेंटर चालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे केली आहे. सध्या पीयूसीसाठी दुचाकी ३५, तीनचाकी ७० असे दर आकारण्यात येत आहेत.
......................
‘एटीएम’ सेवा सुरळित करण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘एटीएम’ सेवा इंटरनेट सुविधेअभावी सोमवारी विस्कळित झाली होती. महिण्यात चौथ्यांदा हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. एटीएम सेवा सुरळित सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे केली.
..................
पोलिस चौक्या उरल्या नावापुरत्या
वाशिम : शहरात साधारणत: १० वर्षांपुर्वी तीन पोलिस चौक्या कार्यान्वित होत्या; मात्र त्यातील पुसद नाका आणि नारायणबाबा मंदिरानजिकची पोलिस चौकी बंद पडली आहे. शिवाजी चौकातील एकमेव चौकी सध्या कार्यान्वित आहे.
...................
तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला
वाशिम : क्रिडाप्रेमी युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणेच तालुका क्रीडा संकुलही उभारले जावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र हा प्रश्न अद्यापपर्यंत निकाली निघालेला नाही.
...................
एस.टी.तील तिकीट मशीन बंदच
मालेगाव : एस.टी. बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी वाहकांना तिकीट मशीन देण्यात आल्या होत्या; मात्र कंत्राट संपल्याचे कारण दाखवून तिकीट मशीन बंद करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी जुन्या पद्धतीने आता तिकीटे दिली जात आहेत.