दहा वर्षांपासून नेत्र रुग्णांना मोफत सेवा; इंझोरीच्या डॉक्टरचा आदर्श उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 06:06 PM2018-12-23T18:06:03+5:302018-12-23T18:06:43+5:30
इंझोरी (वाशिम) : गोरगरीब नेत्ररोग्यांना उपचाराची दिशा कळावी, त्यांचा खर्च वाचावा या उदात्त हेतुने इंझोरी येथील डॉ. प्रकाश खानबरड हे गेल्या १० वर्षांपासून मोफत तपासणी सेवा देत आहेत.
- नरेश आसावा
इंझोरी (वाशिम) : गोरगरीब नेत्ररोग्यांना उपचाराची दिशा कळावी, त्यांचा खर्च वाचावा या उदात्त हेतुने इंझोरी येथील डॉ. प्रकाश खानबरड हे गेल्या १० वर्षांपासून मोफत तपासणी सेवा देत आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेत कमी खर्च व्हावा म्हणून मार्गदर्शनही करीत आहेत. आजवर त्यांनी ९७० रुग्णांची मोफत तपासणी करून विविध ठिकाणी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया सेवेची सोयही करून दिली आहे.
डॉ. प्रकाश खानबरड हे गेल्या १२ ते १४ वर्षांपासून इंझोरी परिसरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करतानाच त्यांनी गत १० वर्षांपासून मोफत नेत्र तपासणीचा उपक्रम सुरू केला आहे. गोरगरीब लोकांना डोळ्यांच्या आजाराची माहिती आणि त्याची गंभीरता कळत नाही. आजार बळावल्यास अनेकांवर अंध होण्याची वेळही येते. त्यातच आजाराची दिशा कळत नसल्याने अनेक जण व्यर्थ खर्च करीत असतात. ही बाब टाळली जावी आणि नेत्ररोग्यांना मोफत तपासणीद्वारे आजाराचा प्रकार आणि प्रमाण कळावे, यासाठी विविध ठिकाणच्या रु ग्णांना तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहनही ते करतात. या तपासणीसाठी दिवस निश्चित करून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करतात आणि उपचारासाठी मार्गदर्शन करतात. गेल्या १० वर्षांत त्यांनी परिसरातील ९७० रुग्णांची मोफत तपासणी केली आहे. यंदाही २० डिसेंबर रोजी त्यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदकि शोर तोतला, ग्रामचेतना मंडळाचे अध्यक्ष राजकुमार दिघडे, प्रकाश राठोड, चंदू शहा, संदीप देवघरे यांनी सहकार्य केले. रुग्णांच्या नेत्रतपासणीसाठी डॉ. जाधव, त्र्यंबक लेन्डे यांनी मदत केली.