शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप !
By admin | Published: June 24, 2017 01:13 PM2017-06-24T13:13:34+5:302017-06-24T13:13:34+5:30
सन २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वीप्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाणार आहे.
वाशिम : सन २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षात पूर्वीप्रमाणेच १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाणार आहे. १ लाख ४२ हजार ७६३ विद्यार्थ्यांना सात लाख ९१ हजार ३६७ पाठ्यपुस्तकांचा लाभ शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच दिला जाणार आहे.
उन्हाळी सुटीनंतर २७ जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शासनाच्या धोरणानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरणासाठी मागील वर्षीच्या विद्यार्थिसंख्येनुसार बालभारतीकडे पुस्तकांची मागणी करण्यात आलेली होती. बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा केला जातो. विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून सर्व शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खासगी अनुदानित शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार पुस्तकांची मागणी नोंदविली होती. त्यानुसार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ७६३ विद्यार्थ्यांना सात लाख ९१ हजार ३६७ पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.
यामध्ये कारंजा तालुक्यातील २२ हजार ६२५ विद्यार्थ्यांना एक लाख २४ हजार ६३८ पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. याप्रमाणे मालेगाव तालुक्यातील २२ हजार ८२ विद्यार्थ्यांना एक लाख २१ हजार ६९८ पाठ्यपुस्तके, मंगरूळपीर तालुक्यातील १९ हजार ५४५ विद्यार्थ्यांना एक लाख १० हजार २५६ पाठ्यपुस्तके, मानोरा तालुक्यातील १८ हजार ३८९ विद्यार्थ्यांना ९८ हजार ११६ पाठ्यपुस्तके, रिसोड तालुक्यातील २८ हजार ५२९ विद्यार्थ्यांना एक लाख ५८ हजार ४०४ पाठ्यपुस्तके तर वाशिम तालुक्यातील ३१ हजार ५९३ विद्यार्थ्यांना एक लाख ७८ हजार २५५ पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे.