अनाथ बालकांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:27 PM2018-07-06T14:27:21+5:302018-07-06T14:28:58+5:30
पात्र अनाथ बालकांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले.
वाशिम : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार महिला व बाल विकास विभागाद्वारे बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत कार्यरत असलेल्या मान्यता प्राप्त संस्थेतील अनाथ बालकांवर धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. पात्र अनाथ बालकांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले.
सर्व धर्मदाय रुग्णालयाच्या बाबतीत महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ अ प्रमाणे बाल न्याय अधिनियम २०१५ अन्वये कार्यरत असलेल्या वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील दिशा मुलींचे निरीक्षणगृह, मानोरा येथील जिजामाता बालगृह, मंगरुळपीर येथील जय बजरंग बहुद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, कंझारा येथील वंदनाताई बालगृह या मान्यता प्राप्त संस्थेतील अनाथ बालकांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. संबंधित रुग्णालयांना यासंदर्भात सूचना दिल्या असून, पात्र बालकांनीदेखील याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुभाष राठोड यांनी केले.