फळ विक्रेत्यांचा रिसोड नगर परिषदेत ‘राडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:08 AM2020-06-12T11:08:51+5:302020-06-12T11:09:10+5:30

फळ विक्रेत्यांनी ११ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगर परिषदेत धडक देत कारवाई थांबविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.

fruit sellers agitation in Risod Municipal Council | फळ विक्रेत्यांचा रिसोड नगर परिषदेत ‘राडा’

फळ विक्रेत्यांचा रिसोड नगर परिषदेत ‘राडा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : अगोदरच लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून धंदा नाही, त्यात आता नगर परिषदेची चमू कारवाईचा बडगा उगारत असल्याचा आरोप करीत फळ विक्रेत्यांनी ११ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगर परिषदेत धडक देत कारवाई थांबविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा पडला.
रिसोड नगर परिषदेतर्फे आंबेडकर चौक ते लोणी फाटा या रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून १० मे रोजी संबंधित फळ व भाजीपाला विक्रेत्यांना हाकलून हा रस्ता मोकळा करण्यात आला. ११ मे रोजी संबंधित फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी १० ते १५ फूट अंतरावर आपल्या फळांच्या हातगाड्या व खाली बसून व्यवसाय करीत असताना, रिसोड नगर परिषद कर्मचाऱ्यांनी या विक्रेत्यांना संबंधित ठिकाणावरून जाण्याच्या सूचना केल्या. यावर आक्रमक होत विक्रेत्यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगर परिषद कार्यालय गाठून नगर परिषदेविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला. लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून धंदे बंद आहेत. सर्वजण घरातच बसून आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी येत आहे. इतर सर्व दुकाने सुरू असताना केवळ भाजीपाला व फळ विक्रेत्यांनाच का टार्गेट केले जात आहे, हा आमच्यावर अन्याय का आदी प्रश्नांचा भडीमार करून विक्रेत्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी रिसोड पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून तुम्हाला योग्य ती जागा देण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरून प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर या परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. मुख्याधिकाºयांना शहरातील परिस्थिती हाताळता येत नसल्याचा आरोप यावेळी फळ विक्रेत्यांनी केला. सदर प्रकरण यापुढे कोणते वळण घेते, पर्यायी जागा मिळते की नाही, याकडे फळविक्रेत्यांचे लक्ष लागून आहे.


रस्त्यावर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शहरात गर्दी होणार नाही, कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. फळ विक्रेत्यांनी कमीत कमी दहा फूट अंतर ठेवून आपल्या हातगाड्या लावाव्या तसेच रस्त्यावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने मागील दोन, अडीच महिन्यांपासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही. फळ विक्री हा आमचा व्यवसाय आहे. यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी नगर परिषदतर्फे परवानगी द्यावी. आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत व्यवसाय करू.
-शीला मोरे, फळ विक्रेत्या रिसोड


शहरात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. दुकानदार व विक्रेत्यांनीदेखील गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे. रिसोड नगर परिषदतर्फे फळ विक्रेत्यांना विशिष्ट जागा देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करावी. जेणेकरून त्यांची उपजीविका भागेल.
- महेंद्र गवई
प्रभारी ठाणेदार, रिसोड

 

Web Title: fruit sellers agitation in Risod Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.