पाऊण एकराच्या धुऱ्यावर फुलविली फळांची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:40+5:302021-05-20T04:44:40+5:30
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आसाराम गीते यांनी २५ वर्षांपूर्वी बी.ए., बीएडचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे भाऊ भानुदास गीते यांनीही बीए ...
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आसाराम गीते यांनी २५ वर्षांपूर्वी बी.ए., बीएडचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे भाऊ भानुदास गीते यांनीही बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणाच्या जोरावर दोघांनीही शासकीय नोकरी लागण्याकरिता अथक प्रयत्न केले; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. असे असताना न कंटाळता त्यांनी शेतातूनच विक्रमी उत्पन्न काढण्यासाठी पुढाकार घेतला.
भर जहागीर हे गाव रिसोड तालुक्यात सर्वाधिक व वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांसाठी कधीकाळी प्रसिद्ध होते. कालांतराने आंब्याची अनेक झाडे नामशेष झाली. गीते बंधूंनी परिसरातील जातीवंत आंब्याच्या कलमांचे जतन करून संगोपन केले. त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले असून त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात आंबे लागले आहेत. त्यास भर जहागीरच नव्हे; तर रिसोड तालुक्यातील विविध गावांमधून जोरदार मागणी व्हायला लागली आहे. गीते बंधूंच्या या प्रयोगशीलतेचे सर्वत्र काैतुक होत आहे.
.............................
कोट :
आम्ही भावंडांनी वर्तमान नव्हे; तर भविष्याचा विचार करून शेतातील बांधावर आंब्यासह विविध फळांची झाडे गेल्या १५ वर्षांपासून जतन केली आहेत. आता या झाडांना चांगल्यापैकी फळधारणा होत असून उत्पन्नात भर पडली आहे.
- आसाराम गीते, शेतकरी, भर जहागीर