कापूस उत्पादकांचीही बाजारात निराशाच
By admin | Published: November 19, 2016 02:25 AM2016-11-19T02:25:13+5:302016-11-19T02:25:13+5:30
नगण्य हमीभाव; अडचणीपोटी बेभाव विक्री.
वाशिम, दि. १८- यंदा पोषक हवामानामुळे कपाशीचे उत्पादन थोडे चांगले झाले. त्यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर निर्माण झालेला आनंद क्षणीकच ठरला आहे. शासनाकडून नगण्य हमीभाव मिळाल्याने सोयाबीन आणि मूग, उडीदाप्रमाणेच कापूस उत्पादक शेतकर्यांच्याच्या पदरीही बाजारात निराशाच येत आहे.
शासनाचे कापसाबाबतचे धोरण, तसेच विविध अस्मानी आणि सुल्तानी संकटांमुळे कधी काळी कपाशीसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात आता कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामध्ये प्रामुख्याने विदभार्तील वाशिम जिल्ह्याचा समावेश करता येईल. पूर्वी वाशिम जिल्ह्यात तूर, ज्वारी आणि कपाशी या तीन पिकांवर शेतकर्यांचा भर असायचा; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत या पिकांना भाव मिळेनासे झाल्याने कापसाचे उत्पादन घटत गेले. मागील काही वर्षांनंतर चांगल्या वातावरणामुळे कपाशीच्या पेर्यात थोडी वाढ झाली आणि पोषक हवामानामुळे या पिकाचे उत्पादनही बर्यापैकी झाले. आता इतर पिकांच्या तुलनेत कपाशीला किमान सहा हजार हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून असताना या पिकाला केवळ चार हजार १६0 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी निराश झाले असून, व्यापारीही कपाशीला पाच हजारांपेक्षा अधिक भाव देत नसल्यामुळे शेतकर्यांची एकप्रकारे पिळवणूकच झाली आहे. त्यातच शासनाकडून हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर चलन तुटवड्यामुळे काही शेतकर्यांना कापूस विकूनही वेळेवर पैसे मिळणासे झाले आहेत.