फळबाग योजनेचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:03 PM2020-11-04T12:03:57+5:302020-11-04T12:04:03+5:30
पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सर्व तालुका कृषि अधिकारी यांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फळबाग लागवडीला चालना देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२०-२१ मध्ये १७२० हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सर्व तालुका कृषि अधिकारी यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात ३ नोव्हेंबर रोजी आयोजित कृषि विभागाच्या विविध योजना तसेच ‘आत्मा’ नियामक मंडळाच्या आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांच्यासह संबंधित विभागांचे शासकीय अधिकारी, अशासकीय सदस्य, सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, इतर पिकांच्या तुलनेत फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील काही क्षेत्रात फळबाग लागवड करावी, यासाठी, कृषि विभागाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृषि सहाय्यकाने त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान १० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला असून त्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.