अपघातात ठार झालेल्या पाच जणांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 03:16 PM2018-09-24T15:16:38+5:302018-09-24T15:18:00+5:30
शोकाकूल वातावरणात पाचही जणांवर रविवारी सायंकाळी शिरपूर, भर जहॉगीर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भर जहागीर/शिरपूर (वाशिम) : लोणार जि. बुलडाणा येथील रविवार, २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. या दुदैर्वी घटनेने १९ ते २८ वयोगटातील चार महिलांचे कुंकू पुसले गेले तर सात चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले. शोकाकूल वातावरणात पाचही जणांवर रविवारी सायंकाळी शिरपूर, भर जहॉगीर येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीच्या वाहनाला ब्राम्हण चिकना (ता. लोणार) गावाजवळ लक्झरी वाहनाची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. बँड पार्टीच्या पीकअप वाहनात भर जहागीर व शिरपूर येथील एकूण १९ जण होते. यापैकी ज्ञानेश्वर वामन डोंगरे (१९), अरूण संजय कांबळे (२२), राजू भगवान कांबळे (२३) सर्व रा. भरजहागीर तसेच प्रवीण दशरथ कांबळे (२५) व गणेश सदाशीव बांगरे (३२) सर्व रा. शिरपूर असे पाच जण ठार झाले.
मृतक ज्ञानेश्वर डोंगरे याच्या कुटुंबात केवळ आई असून, ज्ञानेश्वर हाच आईचा आधारवड होता. ज्ञानेश्वरच्या अपघाती निधनाने आई पोरकी झाली असून वृध्दापकाळातील आधारवड गेल्याने आईने एकच आक्रोश केला. मृतक अरूण कांबळे याचे गेल्यावर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण आहे. कुंकवाचा धनी गेल्याने पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. कांबळे कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. मृतक राजू भगवान कांबळे याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ व विवाहित बहिण आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला. मृतक प्रवीण कांबळे याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. वाजंत्रीचे काम करून प्रवीण हा कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी व ३ वर्षीय चिमुकल्याचे छत्र हरविल्याने कुटुंब पोरके झाले. मृतक गणेश बांगरे याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई , वडील, दोन भाऊ आहेत. मृतक गणेशची लहान मुलगी ६ महिने वयाची असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने उदरनिवार्हाचा गहण प्रश्न निर्माण झाला.
अपघाती निधनाची वार्ता भर जहागीर व शिरपूर येथे धडकताच गावावर शोककळा पसरली. पाच कुटुंबियांच्या आक्रोशाने आसमंत भेदून गेला. २३ सप्टेंबर रोजी सर्वांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडोच्या संख्येने परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या राजू आश्रू कांबळे (२४), संजय भगवान कांबळे (१७), आकाश आत्माराम कांबळे (१८), ज्ञानेश्वर प्रल्हाद उबाळे (१८) रा. सर्व भर जहॉगीर, किशोर शेषराव जोगदंड (३०) रा. कापडसिंगी या चार जणांवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर प्रभू शंकर कांबळे (२२), प्रवीण गंगाराम कांबळे (१७), नितीन रमेश आठवले (१८), मंगेश शिवाजी पारवे (१८), दुर्गादास शिवाजी पारवे (२१) या पाच जणांवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सज्जन आश्रू आढाव (१९), विशाल आश्रू आढाव (१६) या दोघांवर मेहकर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यासाठी गावातील सद्गृहस्थ, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी आर्थिक मदत केली आहे.