डाळिंबावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव; दर्जा घसरल्याने बेभाव विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:10 PM2018-08-27T14:10:24+5:302018-08-27T14:12:49+5:30
वाशिम: जिल्ह्यात आॅगस्टच्या मध्यंतरी आलेल्या जोरदार पावसामुळे डाळिंबाच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात आॅगस्टच्या मध्यंतरी आलेल्या जोरदार पावसामुळे डाळिंबाच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगामुळे डाळिंबाचा दर्जा खालावला असून, फळेही गळून पडत आहेत. त्यातच दर्जा खालावल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता या फळांची बेभाव विक्री करावी लागत आहे.
वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल १२५० हेक्टर क्षेत्रावर हे फळपिक लावण्यात आले असून, या फळाच्या आधारे शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. डाळिंबाचे आंबिया आणि मृग असे दोन बहर असतात. या दोन्ही हंगामात बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होत असतो. या रोगाच्या प्रादुर्भावासाठी अति पाऊस हे एक प्रमुख कारण आहे. त्यातच पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी पूरक असते. जिल्ह्यात १२ आॅगस्टनंतर कोसळलेल्या धो-धो पावसामुळे या हंगामातील डाळिंबाच्या मृग बहारावर या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येत आहे. अनेक ठिकाणी बुरशीमुळे फळे सुकून गळत आहेत, तर फळांचा दर्जाही मोठ्या प्रमाणात खालावला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बुरशीजन्य रोगावर नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून डाळिंब उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात येत असले तरी, हा रोग नियंत्रणापलिकडे गेला आहे. त्यामुळे शेतकºयांकडे डाळिंब तोडून टाकणे हाच पर्याय उरला आहे.
पावसाच्या अतिप्रमाणामुळे डाळिंबावर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होतो. सहसा मृग बहारातच या रोगाची लागण होते. शेतकºयांनी वेळीच उपाय करणे त्यासाठी आवश्यक असते. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करून त्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
-दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाशिम