जात पडताळणी कार्यालयात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:19 PM2020-12-25T13:19:59+5:302020-12-25T13:20:11+5:30
Washim News जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयावर उमेदवार आणि विद्यार्थ्यांची गर्दी उसळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसह विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यास वाशिम येथील जात पडताळणी कार्यालयात गर्दी करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पार फज्जा उडत असल्याचे दिसत आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची जात पडताळणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
शिवाय यंदाचे शैक्षणिक सत्र संपत आले असताना पुढील उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयावर उमेदवार आणि विद्यार्थ्यांची गर्दी उसळत आहे.
जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे; परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात त्याची फारशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र दिसत असून, कार्यालयाबाहेर खिडकीजवळ विद्यार्थी आणि उमेदवारांची मोठी रांगच लागत आहे. कार्यालय प्रशासनाच्या सूचनेनंतरही फिजिकल डिस्टन्सिंगची दखल घेतली जात नाही.
उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धडपड
विद्यार्थ्यांना येत्या ३० डिसेंबरपर्यंत जात पडताळणी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी लगबग सुरू असून, प्रामुख्याने वैद्यकीय अभ्यासक्रम, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठी धडपड होत आहे.
ग्रामपंचायत उमेदवारांची लगबग
३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत असून उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची प्रत जोडणे आवश्यक आहे. यासाठी अवघे पाच दिवस उरले असल्याने उमेदवारांची लगबग सुरू आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव दाखल करण्यास उमेदवारांसह विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत; परंतु प्रस्ताव दाखल करणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे मुळीच पालन केले जात नाही.
-छाया कुलाल,
जात पडताळणी उपआयुक्त, वाशिम