कोरोनाच्या परिस्थितीवर जिल्हा कृषी महोत्सवांचे भवितव्य अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 04:43 PM2020-10-19T16:43:16+5:302020-10-19T16:43:27+5:30
कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
वाशिम : शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करणे, ग्राहक ते शेतकरी थेट शेतमाल विक्रीची जोड घालणे आदी उद्देशाने दरवर्षी राज्यात जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा कृषी महोत्सव होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास हा महोत्सव घेण्यात यावा अन्यथा २०२१-२२ मध्ये आयोजन करावे, अशा स्पष्ट सूचना कृषी विभागाने १६ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या.
बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देणे, प्रयोगशील व प्रगतशील शेतकºयांच्या माध्यमातून इतर शेतकºयांना विचाराची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देणे, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संधी आदी उद्देशातून सन २०१७ पासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद, प्रगतशील शेतकरी किंवा उद्योजकांची व्याख्याने, धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव आदींचे आयोजन करण्यात येते. परंतू, यंदा कोरोनाचे सावट असल्याने आणि कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कृषी विभागाने जिल्हा कृषी महोत्सवासंदर्भात जिल्हास्तरीय यंत्रणेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास सन २०२०-२१ या वर्षात कृषी महोत्सव घेण्यात यावा अन्यथा पुढील आर्थिक वर्षात अर्थात २०२१-२२ मध्ये जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करावे, अशा सूचना कृषी विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला १६ आॅक्टोबरला दिल्या. त्यानुसार वाशिमसह अमरावती विभागात चालू आर्थिक वर्षात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर कृषी महोत्सव होईल अन्यथा यंदाचा कृषी महोत्सव रद्दही होऊ शकतो, असा अंदाज कृषी विभागातून वर्तविण्यात येत आहे.