गडकरींच्या ‘लेटरबॉम्बमुळे’ वाशिम जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 12:22 PM2021-08-17T12:22:56+5:302021-08-17T12:23:16+5:30
Nitin Gadkari's 'letterbomb' : जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यात हाच विषय चर्चिला जात आहे.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लाेकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे पत्र पाठविले. या पत्राने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यात हाच विषय चर्चिला जात आहे. यासंदर्भात खा. भावना गवळी यांचे मत जाणून घेतले असता, रस्ते विकास कार्यात अडथळे नव्हे, तर नागरिकांच्या समस्यांना आपण रीतसर, नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून साेडविण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाचे, कंत्राटदारांचे काेणतेही नुकसान हाेणार नाही असे कृत्य शिवसेनेतर्फे करण्यात आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ना. गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मेडशी ते वाशिमदरम्यान हाेत असलेल्या १२ कि.मी. बायपासचे, मालेगाव ते रिसाेड या राष्ट्रीय महामार्गाचे एक पुलाचे, तर शेलूबाजार रस्त्यावरील काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात भावना गवळी यांनी नागरिकांच्या आलेल्या तक्रारी आपण स्वत: नितीन गडकरी यांच्याकडे केल्याचे म्हटले आहे. रिसाेड परिसरात पडलेले खड्ड्यांमुळे दाेन जणांचा जीव गेल्याने त्या भागातील शिवसैनिक प्रदीप माेरे यांनी आंदाेलन केले व रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले. यावर शिवसैनिक महादेव ठाकरे यांनी जाब विचारला व त्यासंदर्भात माझ्याकडे तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारी मी स्वत:च नितीन गडकरी यांना पाठविल्या, तसेच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले. मी स्वत: सुरू असलेल्या कामावर जाऊन ना काेणते आंदाेलन केले, ना काेणती ताेडफाेड केली, असेही गवळी यांनी सांगितले.
दरम्यान, धमकीसत्राच्या चाैकशीचे गृहविभागाने पाेलीस महासंचालकांना पत्र पाठवून अहवाल मागविला आहे. यासंदर्भात पाेलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्याशी चर्चा केली असता अद्याप काेणतीही माहिती मागविली नसल्याचे त्यांनी सांगितले.