अतिक्रमणावर गजराज
By admin | Published: November 27, 2015 01:47 AM2015-11-27T01:47:18+5:302015-11-27T01:47:18+5:30
मालेगाव नगर पंचायत प्रशासनाची कारवाई.
मालेगाव (जि. वाशिम) : अनेक वर्षांंपासून फोफावलेले मालेगाव शहरातील अतिक्रमण गुरूवारी नगर पंचायत प्रशासनाने नेस्तनाबूत केले. अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्याच्या १0 दिवसानंतर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. मालेगाव ग्राम पंचायतचे रुपांतर १७ जुलै रोजी नगर पंचायतमध्ये झाले. नगर पंचायत प्रशासकपदी तहसीलदार सोनाली मेटकरी या रुजू झाल्या. सूत्रे स्वीकारल्यानंतर मेटकरी यांनी थकीत कर वसुलीकडे लक्ष दिले. नगरपंचायतच्या तिजोरीत ५0 लाखाच्यावर कर टाकला. त्यानंतर मालेगावला अतिक्रमणच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्याचे सुतोवाच १0 दिवसांपूर्वी केले होते. अतिक्रमिकांनी अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. काही व्यक्तींनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सहकार्य केले. त्यानंतरही काही व्यक्तींनी वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढले नाही. या पृष्ठभूमीवर २६ नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहिमेचा आठवडी बाजारापासून प्रारंभ केला. आठवडी बाजारातील अतिक्रमणावर गजराज चालला. मांस विक्रेते, भंगार विक्रेते, वारांगणांचे टिनाचे पक्के शेड, जुन्या ग्रा.पं.कॉम्प्लेक्स मागील जागेतील अतिक्रमण यावेळी जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. आतापर्यंंतची ही कारवाई सर्वात मोठी असल्याचे मानले जात आहे. शहरातील बहुतांश नागरिकांनी अतिक्रमण हटाव मोहीम बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. यापूर्वी २९ मार्च २0१२ रोजी सरपंच डॉ.माने यांच्या कार्यकाळात ९ दिवस अतिक्रमण हटविण्यात आले होते, त्यावेळी शहरातील रस्ते मोकळे करण्यात आले होते. गुरूवारच्या मोहिमेदरम्यान तहसीलदार तथा प्रशासक सोनाली मेटकरी, उपजिल्हाधिकारी क्रांती ढोब, नायब तहसीलदार आर.बी. डाबेराव, तलाठी अमोल पांडे, डी.एन. केंद्रे यांच्यासह नगर पंचायत व महसूल कर्मचारी, पोलीस ठाण मांडून होते.