जुगाऱ्यांचे धाबे दणाणले; धाडसत्रात २० जणांवर गुन्हा, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
By सुनील काकडे | Published: May 11, 2024 07:56 PM2024-05-11T19:56:34+5:302024-05-11T19:56:54+5:30
याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ८१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाशिम : जिल्ह्यातील कारंजा ग्रामिण पोलिसांच्या पथकाने १० मे रोजी ‘ॲक्शन मोड’वर येत शहरात तीन ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ८१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून कारंजा शहरात विविध ठिकाणी राजरोसपणे जुगार अड्डे चालवून हार-जितचा खेळ रंगला होता. त्याची दखल घेत ग्रामिण पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी तीन विशेष पथक नेमून १० मे रोजी धाडसत्र राबविले. यादरम्यान शहर पो.स्टे. हद्दीतील झाशी राणी चौकातील श्रीजल वाईनबारच्या पाठीमागे दुर्गेश सुरजुसे, विजय मेश्राम, सलिम लचमन निन्सूरवाले, नंदू चव्हाण, सुनिलअण्णा उपाध्ये यांना ताब्यात घेवून रोख ७६५० रुपयांसह १ लाख ७२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या पथकाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील हॉटेल विसावाच्या मागे धाड टाकून गजानन गायकवाड, राजेश लाड, ललित पद्मशी खोना व दिनकर लाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. तसेच तिसऱ्या पथकाने मारवाडी पुरा येथील अग्रवाल यांच्या वाड्यात धाड टाकून पवन श्रीराम राय, महेश अहेरराव, संजय धुवार्य, प्रशांत पातूरकर, मोहन गोघलिया, आकाराम वंजारी, अब्दुल रफीक अब्दुल शहीद, प्रकाश मुमाने, रहीम अन्नू कामनावाले, संदीप रावेकर, सुनील गायकवाड यांना ताब्यात घेवून रोख ४२ हजार १२० रुपयांसह ५२ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहर पो.स्टे.च्या हद्दीत ग्रामिण पोलिसांची कारवाई
जुगार अड्डे चालत असलेली तीन्ही ठिकाणे शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतात. असे असताना ग्रामिण पोलिसांच्या पथकाने धडाकेबाज कारवाया करून २० जुगाऱ्यांवर कारवाई केली. शहर पो.स्टे.च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.