जुगार अड्ड्यावर छापा; २ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 05:47 PM2018-07-12T17:47:03+5:302018-07-12T17:47:12+5:30
पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम बिटोडा येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ११ जुलै रोजी रात्री छापा टाकून २.५९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आसेगाव (वाशिम) : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम बिटोडा येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ११ जुलै रोजी रात्री छापा टाकून २.५९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीवरून आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांच्यासह विशेष पथकाने सापळा रचून बिटोडा येथील भीमराव भोयर यांच्या शेतातील खुल्या मैदानात थाटलेल्या टिनशेडमध्ये धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी प्रवीण भोयर (३०), उमेश भोयर (३८), सुभाष भोयर (५२), योगेश राऊत (२७), रामहरी भोयर (२४) आणि प्रकाश भोयर (५५) हे सहाजण जुगार खेळताना आढळून आले.
त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ६ मोबाईल, ४ दुचाकी वाहने, ३३ हजार ७५० रुपये रोख, असा एकूण २ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नमूद आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव, नारायण पांचाळ, ज्ञानेश्वर राठोड, निलेश अहिर, चांद रेगीवाले, विठ्ठल उगले, गणेश इंगळे, अमोल डवने आदींनी सहभाग नोंदविला.