जुगार अड्यावर धाड, १२ जणांना अटक; २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त
By नंदकिशोर नारे | Published: June 8, 2024 04:08 PM2024-06-08T16:08:23+5:302024-06-08T16:13:55+5:30
हातोली येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील एका किराणा दुकानाजवळ जुगारवर हारजीतचा खेळ चालविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
वाशिम : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हातोली व आमगव्हाण येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पथकाने ७ जून राेजी कारवाई करीत १२ जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला
हातोली येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील एका किराणा दुकानाजवळ जुगारवर हारजीतचा खेळ चालविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी किराणा दुकाना जवळ धाड घातली. त्यावेळी त्यांना काही लोक जुगार खेळत असल्याचे दिसून आले. सुनील महादेव पारधी, सुरेश प्रल्हाद पांडे, उंदा तुकडोजी मनोहर, गजानन गुडे हातोली हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून जुगार खेळण्याचे साहित्य व नऊ हजार रुपये मिळून आले.
दुसरी कारवाई आमगव्हाण येथील संतोष रामचंद्र कानोडे यांचे शेतात जुगार खेळ सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आमगव्हाण येथे शेतात सुरु असलेल्या जुगार ठिकाणी लपत छपत गेले असता जुगार खेळताना विनोद गोविंदराव गावंडे, अब्दुल कलाम अब्दुल मन्नान, गोपाल खिराडे, दिनेश चव्हाण, शेख शायर शेख छोटू, शेख युनिस शेख नाजीम, दीपक मारोती पवार, शेख सलीम शेख गुलाम सर्व रा. मानोरा ७ मोटारसायकल, २७०० रुपये नगदी असे एकूण २ लाख ८२ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी पोलीस स्टेशन मानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाणे केली.