अमेरिकेतही थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव
By नंदकिशोर नारे | Published: September 29, 2023 04:27 PM2023-09-29T16:27:18+5:302023-09-29T16:28:39+5:30
अमेरिकेतील जॅक्सनविल फ्लोरिडा भागात राहणारे देशमुख कुटुंबांच्या पुढाकाराने दरवर्षी श्रीगणेशाची स्थापना केली जाते.
वाशिम - बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सगळीकडेच धामधूम असते. गणेशोत्सवाचा हा सोहळा देशभरात तर साजरा झालाच, पण अमेरिकेतील मराठी कुटुंबीयांनीही तो मनोभावे साजरा केला. वाशीम जिल्ह्याचे सुपुत्र सुशील दादाराव देशमुख यांच्या पुढाकाराने जॅक्सनविल फ्लोरिडा येथे स्थापन झालेल्या श्रीगणेशाचे विसर्जन भारतीय प्रमाणवेळेनुसार आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेतीन वाजता हर्षोल्हासात झाले.
अमेरिकेतील जॅक्सनविल फ्लोरिडा भागात राहणारे देशमुख कुटुंबांच्या पुढाकाराने दरवर्षी श्रीगणेशाची स्थापना केली जाते. यावर्षीसुद्धा दहा दिवस त्यांच्याकडे गणेशोत्सवाची धुमधाम होती. विधिवत स्थापनेनंतर दररोज गणरायाचे विधिवत पूजन, आरती, प्रसाद असे सर्व विधी भारताप्रमाणेच तिथेही केले जातात. यामध्ये सुशील यांच्यासह पत्नी सौ. अर्चना सुशील देशमुख यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांचे लहान भाऊ सुजीत आणि सौ. धनश्री सुजीत देशमुख, शिवबा आणि अबीर ही चिमुकली मुले ही सर्व मंंडळी दहा दिवस तल्लीन होऊन, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये रममाण होतात. घरातील लहानथोर सर्वच जण मोठ्या समर्पणभावाने गणेशोत्सवातील सजावटीची आणि एकूणच सगळी कामे आनंदाने करतात.
दररोज दोन्ही वेळा गणरायाची विधिवत पूजा होते. आरती केली जाते. प्रसाद वितरित केला जातो. यासाठीचे पूजन साहित्य आधीच आणून ठेवलेले असते. गणेशोत्सव काळात देशमुख कुटुंबीयांच्या उत्साहाला उधाण येते. भक्तिभावाने गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. पण त्याची तयारी मात्र आठवडाभर आधीपासूनच सुरू होते.
सुशील आणि सुजीत यांचे वडील दादाराव दिनकरराव देशमुख हे मूळ शिरपूरजैनचे. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी नोकरी केली. बदल्यांचा परिणाम मुलाबाळांच्या शिक्षणावर होऊ नये म्हणून ते बुलडाण्यात स्थायिक झाले. त्यांचे थोरले चिरंजीव सुशील यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुणे येथील एका आयटी कंपनीमध्ये रुजू झाले. सुशील यांना चार लहान भावंडे आहेत. स्वतः एमबीए होण्याचे स्वप्न बाजूला ठेवून आपल्या चारही लहान भावंडांना पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांमधून पदवीधर बनवले. त्यांनाही स्वतःच्या पायावर उभे केले.
आयटीच्या बक्कळ पगाराची ही नोकरी सोडून बारा वर्षांपूर्वी सुशील यांनी आपली स्वतःची कंपनी भारतात आणि अमेरिकेत स्थापन केली. ती लीलया चालवली. आज त्यांच्या या कंपनीने जागतिक मानांक असलेली ग्रेट प्लेस टू वर्क ही उपाधी पटकावली आहे. ग्रामीण भागातील एका मराठी कुटुंबाची ही कामगिरी अभिमानाने ऊर भरून यावा, अशीच आहे. अमेरिकेत स्थायिक होऊन आज या कुटुंबाला बारा वर्षे झाली आहेत. ते जेव्हापासून तिथे स्थायिक झाले, तेव्हापासून दरवर्षी अगदी थाटामाटात श्रीगणेशाची स्थापना करतात. देशमुख कुटुंबातील ह्या बाप्पाच्या दर्शनासाठी भारतातीलच नव्हे तर परदेशी भाविकांनीही लाभ घेतला. दररोज आरतीला रेलचेल असायची. आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवून ठेवत घरामागील परसबागेत भाविकांसाठी शामियाना आणि मशालींची सजावट केली होती. त्यांच्यासोबत आजूबाजूचे शेजारीही या गणेशोत्सवात मोलाचा वाटा उचलतात. अमेरिकेतील या महाप्रसादास शंभरावर भाविकांनी हजेरी लावली होती. त्यामुळेच या गणेशोत्सवास घरगुती नव्हे तर सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप आले होते. शेवटच्या दिवशी आयोजित महाप्रसादाचा लाभ अमेरिकेतील शंभरावर भाविकांनी घेतला.
अमेरिकेत मराठी बाणा जपणारी माणसं
देशमुख कुटुंबीयांच्या सोबतीला रितेश सोरते चंद्रपूर, महेश अतकरे अकोला, सचिन धायडे उदगीर, योगेश साळुंखे लातूर, एस. जोगळेकर मुंबई अशी काही महाराष्टीयन कुटुंब आसपास राहतात. तेसुद्धा या गणेशोत्सवात सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून सुशील देशमुख यांच्या घरामागील परसबागेत बाप्पाचे विसर्जन केले. तसे तर बाप्पाचे विसर्जन जॅक्सनविल बिचवर करायचे होते. मात्र, धो-धो पाऊस असल्याने बाप्पाचे विसर्जन घरच्याघरी कुंडात करावे लागले, अशी माहिती सुशील आणि सुजीत देशमुख यांनी अमेरिकेतून दिली.