मालेगाव शहरातील घंटागाड्या बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:55 PM2020-12-08T15:55:47+5:302020-12-08T15:56:40+5:30
Malegaon News केरकचरा संकलनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : करार संपल्याने आणि विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया सुरू न झाल्याने मालेगाव शहरातील घंटागाड्या बंद झाल्या आहेत. यामुळे शहरातील केरकचरा संकलनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. शहरातील नागरिकांकडून घंटागाड्या आणि अग्निशमन कर वसूल करण्यात आला. गेल्या दीड महिन्यापासून मागील कंत्राटदाराचा कंत्राट संपल्याने काही दिवस घंटागाड्या जागेवर होत्या. त्यानंतर नगरपंचायतीने त्या गाड्या स्वत: चालविल्या. त्यामागे चालकाचा खर्च, वाहन दुरूस्ती, डिझेल, ट्रॅक्टर आदीचा खर्च होत आहे. हा पैसा जनतेकडून कररुपाने वसूल करण्यात येतो. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निविदा प्रक्रिया होऊ शकली नाही. दोन दिवस घंटागाड्या बंद होत्या. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरच कचरा टाकायला सुरुवात केली. नगरपंचायतीने निविदा प्रक्रिया राबवून घंटागाड्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
निवडणुक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया झाली नाही. आता लवकरच निविदा प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे. बंद असलेल्या घंटागाड्या सुरू करण्यात येतील.
- सतीश शेवदा
अभियंता नगर पंचायत मालेगाव