गॅस दरवाढीमुळे धुरमुक्त अभियानाला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:06+5:302021-03-04T05:19:06+5:30
फेब्रुवारी महिन्यात ४ तारखेला २५ आणि १४ तारखेला ५०, २५ तारखेला २५ रुपयांनी गॅसची किंमत वाढविण्यात आली. १ मार्च ...
फेब्रुवारी महिन्यात ४ तारखेला २५ आणि १४ तारखेला ५०, २५ तारखेला २५ रुपयांनी गॅसची किंमत वाढविण्यात आली. १ मार्च रोजी पुन्हा २५ रुपयांनी वाढ झाल्याने आता अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर ८५२.५० रुपयांना घ्यावा लागत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने धूरमुक्त अभियान राबवून ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना गॅसचे वितरण केले आहे, सिलिंडरची किंमत वाढल्याने आणि ते खरेदीसाठी आर्थिक कुवत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सिलिंडर अडगळीत टाकून पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी, धूरमुक्त अभियानाला खीळ बसली आहे.
....................
कोट :
पूर्वी आम्ही चुलीवर किंवा रॉकेलवर चालणाऱ्या ‘स्टोव्ह’वर स्वयंपाक करायचो. शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडर दिला आणि धुरापासून सुटका झाली; मात्र आता सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने आणि त्यासाठी आर्थिक कुवत नसल्याने पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ ओढवली आहे.
- राधा इंगळे, मेडशी
...................
गॅस सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याने मासिक बजेट पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या दरवाढीमुळे पुन्हा एकवेळ चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. शासनाने किमान स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणात ठेवायला हवे, अशी अपेक्षा आहे.
- सारिका कान्हेड, मालेगाव