माहुरवेस परिसरातून ३७ धारदार शस्त्रे हस्तगत, वाशिम शहर पोलीसांची कारवाई, एकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 05:04 PM2017-11-01T17:04:50+5:302017-11-01T17:06:38+5:30
वाशिम शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलिसांनी १९ तलवार
वाशिम - शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलिसांनी १९ तलवार व १८ कत्ते असे एकूण ३७ धारदार शस्त्रे हस्तगत केले. ही कारवाई १ नोव्हेंबरला सकाळी ११:३० वाजताचे सुमारास करण्यात आली.
वाशिम शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेला १९ वर्षीय बबलू गायकवाड याचे घरामध्ये अवैधरित्या धारदार शस्त्राची साठवणू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकाचे प्रमुख बी. डी. अवचार, प्रशांत अंभोरे, राजेश बायस्कर, ज्ञानदेव म्हात्रे व महिला पोलीस शिपाई मोहिनी वर्धे यांचा समावेश असलेल्या पथकाने गायकवाड याचे घरामध्ये छापा टाकुन घराची तपासणी केली. या तपासणी मध्ये गायकवाड याचे घरातील सज्जावर १९ तलवार व १८ कत्ते आढळून आले. पोलीसांनी या शस्त्रासह बबलू गायकवाड याला अटक केली.
विसर्जन मिरवणुकीत वापरतात शस्त्रे
माहुरवेस परिसरातील गायकवाड याचे घरामधुन जप्त केलेली धारदार शस्त्रे ही गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी ट्रकवर लावल्या जात असल्याची माहिती आहे. बबलू गायकवाड हा एका गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष असल्याने ही शस्त्रे त्याने आपल्या घरामध्ये ठेवली होती. जप्त केलेली शस्त्रे घरामध्ये बाळगुन ठेवण्यामागे त्याचा कोणताही वाईट हेतू नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.