पीक कर्जाची रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:55 PM2018-05-28T13:55:13+5:302018-05-28T13:55:13+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : चौथा शनिवार आणि त्यानंतर रविवारची सुटी आल्यामुळे बँका दोन दिवस बंद होत्या. दरम्यान, सोमवारी बँकांचे कामकाज सुरू होताच सकाळपासूनच मंजूर खरीप पीक कर्जाची रक्कम ‘विड्रॉल’ करण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.
वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना १४७५ कोटी रुपये पीक कर्ज वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, मध्यंतरी कर्ज देण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून १९ बँकांचे ‘नो-ड्यूज’ मागविले जात होते. या प्रक्रियेत शेतकऱ्यांची होणारी ओढाताण ‘लोकमत’ने विविधांगी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून कुठल्याही शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी ‘नो-ड्यूज’ मागू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण यापुढे निश्चितपणे वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तद्वतच ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर झाले, त्यांनी सदर रक्कम बँकेतून ‘विड्रॉल’ करून खरीप हंगामासाठी लागणाऱ्या साहित्यांची जुळवाजुळव करणे सुरू केले आहे. त्यामुळेच बँकांमध्ये सद्या शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.