ट्रॅक्टरसाठी डिझेल भरण्यास परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:52+5:302021-05-12T04:41:52+5:30
शिरपूर जैन : शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरकरिता लागणारे डिझेल जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पेट्रोलपंपधारकांनी बंद केल्याने शेती मशागतीचे काम ...
शिरपूर जैन : शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरकरिता लागणारे डिझेल जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पेट्रोलपंपधारकांनी बंद केल्याने शेती मशागतीचे काम रखडली आहेत. त्यामुळे शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरकरिता लागणारे डिझेल भरण्याला परवानगी मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
१० मेपर्यंत शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल देण्याची मुभा पेट्रोलपंपधारकांना होती. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी हे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागतही जोमाने करू लागले. मात्र जिल्हा प्रशासनाने ११ मेपासून ट्रॅक्टरमध्ये डिझेल देणे बंद केले. याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या शेती मशागतीच्या कामावर झाला. ११ मे रोजी सकाळी पेट्रोलपंपावर डिझेल घेण्यासाठी आलेले ट्रॅक्टर शेतकऱ्यांना तसेच माघारी फिरवावे लागले. त्यामुळे शेती मशागतीच्या कामात खोडा निर्माण झाला आहे. डिझेल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी याविषयी संताप व्यक्त केला.
..
पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. खरीप हंगामासाठी ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र ट्रॅक्टरमध्ये डिझेल देणे बंद केल्याने शेतीची कामे रखडली आहेत. शेतीप्रधान देशात शेतीच्या कामालाच डिझेल न देणे यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते.
भगवान शिंदे
शेतकरी, पांगरखेडा