कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास त्वरित चाचणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:15+5:302021-04-14T04:37:15+5:30
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती ...
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यास मनात कोणतीही भीती न बाळगता त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सोमवारी केले. आरोग्यविषयक आढावा घेताना ते बोलत होते.
सर्दी, ताप, घसादुखी, अंगदुखी, खोकला ही कोरोना विषाणू संसर्गाची प्रमुख लक्षणे आहेत. यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास अधिक वेळ न घेता नागरिकांनी त्वरित नजीकच्या कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, संसर्गाचे निदान होण्यास विलंब होऊन वेळेवर उपचार सुरु न झाल्यास रुग्ण दगावण्याचा धोका असतो. गेल्या काही दिवसात झालेल्या मृत्यूंपैकी बहुतांशी मृत्यू हे या कारणानेच झाले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचे वेळेवर निदान व उपचार होण्यासाठी नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे दिसल्यास मनात कोणतीही भीती न बाळगता त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आहे.
०००
बॉक्स
अंमलबजावणीस अडथळा आणल्यास कठोर कारवाई
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना सुरु आहेत. याअंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रांची निर्मिती, नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मोहीम स्वरुपात कार्यवाही सुरु आहे. यासाठी गावामध्ये, आपल्या भागामध्ये येणाऱ्या आरोग्य पथकांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा असहकार्य करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईचा आदेश दिला आहे. आपल्या स्वत:च्या, परिवाराच्या तसेच समाजाच्या सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे.