घरकुल योजना : अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी आक्षेप मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:33 PM2018-12-02T14:33:24+5:302018-12-02T14:34:26+5:30
वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यात आल्या आहेत.
वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायतींमध्ये जवळपास १८ हजार ७३८ नोंदी प्रमाणित झाल्या असून, यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून ग्रामपंचायत स्तरावर ७ डिसेंबरपर्यंत आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत.
शासनाच्यावतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते. जागेअभावी संबंधित लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करावयाचे आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे. अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर संगणकीय प्रणालीमध्ये याबाबतच्या नोंदी घेण्यासाठी १५ नोव्हेंबर २०१८ अशी मुदत देण्यात आली होती. संगणकीय प्रणालीवर अतिक्रमणधारकांच्या नोंदीबाबत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाºयांनी त्यांच्या लॉग-इन मधून सदर नोंदी प्रमाणित करणे असा हा कार्यक्रम आहे. जिल्ह्यात जवळपास १८ हजार ७३८ नोंदी प्रमाणित झाल्या असून, यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठळक, दर्शनी भागात अतिक्रमणधारकांची यादी लावण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत. या याद्यांवर ७ डिसेंबरपर्यंत सूचना, आक्षेप मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी ७ डिसेंबरपर्यंत विहित नमुन्यात सूचना, आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले. प्राप्त सूचना, हरकतींची पडताळणी झाल्यानंतर संगणकीय प्रणालीवर त्यासंदर्भात नोंदी घेतल्या जाणार आहेत. ७ डिसेंबर २०१८ पर्यंत ग्रामसेवकांनी १ जानेवारी २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल तयार करावा आणि हा अहवाल ग्रामपंचायत दप्तरी ठेवावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिल्या आहेत.