गारपिटग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या ! - भारिप-बमसंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:50 PM2018-02-26T15:50:09+5:302018-02-26T15:50:09+5:30
वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली.
वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले असून, तसा अहवाल शासनस्तरावर पाठविल्यानंतर शासनाकडून तातडीने नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी केली. जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले जिरायत पिकाखालील क्षेत्र १२ हजार ४७५ हेक्टर असून यामुळे १२ हजार ७०६ शेतकरी बाधीत झाल्याचे सांगितले जाते. या शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत दिली जाणार असून त्यासाठी ८ कोटी ४८ लाख २८ हजार ८४४ रुपये निधी लागणार आहे. शासनाने जाहिर केलेली हेक्टरी नुकसानभरपाईची रक्कमही तोकडी असून, हेक्टरी २० हजार रुपयांची मदत मिळणे अपेक्षीत आहे. याशिवाय बागायती पिकाखालील नुकसान झालेले क्षेत्र ७२४ हेक्टर असून १२७६ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळण्याकरिता ९७ लाख ७५ हजार ७५५ रुपयांचा निधी लागणार आहे. बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी युसूफ पुंजानी यांनी केली. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३२९ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे नुकसान झाले असून ४२१ शेतकरी यामुळे बाधीत झाले आहेत. त्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे. त्यासाठी ५९ लाख ३२ हजार ३५० रुपये निधीची गरज आहे. शासनाने तातडीने निधीची तरतूद करून शेतकºयांना दिलासा द्यावा अन्यथा भारिप-बमसंतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष पुंजानी यांनी दिला.