एस.टी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र अन् घरकुल द्या!; आदिवासी कोळी समाज संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
By संतोष वानखडे | Published: January 24, 2024 01:50 PM2024-01-24T13:50:58+5:302024-01-24T13:51:03+5:30
दुसऱ्या दिवशी, २४ जानेवारीलाही आंदोलन सुरूच
संतोष वानखडे, वाशिम: आदिवासी कोळी समाजाला एस.टी. प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र वितरीत करावे, शबरी योजनेंतर्गत घरकुल मंजूर करावे यांसह विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ जानेवारीपासून आदिवासी कोळी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली. दुसऱ्या दिवशीही २४ जानेवारीला आंदोलन सुरूच आहे.
आदिवासी कोळी जमातीचे अस्तित्व वाचविण्यासाठी आणि त्यांचे संवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी राज्यस्तरीय महाआंदोलन समितीच्या पुढाकारातून २३ जानेवारीपासून आदिवासी कोळी समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात रुख्मिणी जनक मानकरी, किसन ज्ञानबा काळे व सचिन उत्तम पिठ्ठलवाड यांच्यासह अनेकजण उपोषणास बसले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राचे अर्ज सेतू कार्यालयाने विनाअट स्वीकृत करावे, राजस्व महाअभियान मोहीम राबवून विविध उपप्रकारातील कोळी बांधवांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र वितरीत करावे, केंद्राचे व राज्याचे कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ विनाअट द्यावे, शबरी योजने अंतर्गत आदिवासी कोळी जमातीला घरकुल तात्काळ मंजूर करण्यात यावे यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या.