देवमाणसाचा दर्जा दिला, आता लाथ का मारता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:45 AM2021-09-18T04:45:03+5:302021-09-18T04:45:03+5:30
वाशिम : कोरोनाच्या संकट काळात नियुक्ती मिळाल्यानंतर एकही सुटी न घेता तसेच शनिवार आणि रविवारीही कोरोना रुग्णांची इमानेइतबारे सेवा ...
वाशिम : कोरोनाच्या संकट काळात नियुक्ती मिळाल्यानंतर एकही सुटी न घेता तसेच शनिवार आणि रविवारीही कोरोना रुग्णांची इमानेइतबारे सेवा केली. त्यामुळे कोरोना योद्धा, आरोग्य सेवेतील देवमाणूस म्हणून आमचा गाैरव करण्यात आला; मात्र गरज संपताच आता त्याच देवमाणसांना लाथ का मारता, असा सवाल सेवा समाप्त करण्यात आलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात संबंधितांनी नमूद केले आहे की, वर्षभरापेक्षा अधिक काळ स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सातत्याने कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्ट रोजी तुमची सेवा समाप्त झाल्याचे सांगून घरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यात डाटा एन्ट्री ऑपरेटरचाही समावेश आहे. त्यानंतर काहीच दिवसांत १४ सप्टेंबर रोजी बाह्ययंत्रणेंतर्गत डीईओंची पदभरती जिल्ह्यात करण्यात आली. त्यांना विद्यावेतन म्हणून ९ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या लोकांची नियुक्ती शिकावू म्हणून असेल, जेव्हा की गत दीड वर्षांपासून कार्यरत डाटा एण्ट्री ऑपरेटर पूर्णत: प्रशिक्षित असून, त्यांना कामकाजाची माहितीदेखील आहे. असे असताना आमच्यावर अन्याय करून पदभरती का करीत आहात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
कोविड रुग्णांची संख्या अधिक असताना जनतेने, प्रशासनाने व शासनानेही याच कोरोना योद्धांना देवदूताचा, देवमाणसाचा दर्जा दिला. आता मात्र त्याच लोकांना लाथ मारण्याचे काम प्रशासन करीत आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’च्या या भूमिकेमुळे आम्ही पुरते खचलो असून, अन्याय दूर न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.