‘तीच ती’ कारणे देणे ५१३ जणांना भोवले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:37+5:302021-05-13T04:41:37+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. दवाखाना, मेडिकलमध्ये जात आहे, अंत्यसंस्कारासाठी जात आहे, अशी तीच ती कारणे देताना ठोस पुरावा देऊ न शकणाऱ्या ५१३ जणांवर गत दोन दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली असून, या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच असल्याने ही साखळी तोडण्यासाठी ९ मेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार असून, या दरम्यान मेडिकल, दवाखाने, अंत्यसंस्कार आदी अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या निर्देशाची प्रभावी अंमलबजावणी म्हणून वाशिम शहरात प्रमुख चौकांत बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळच्या सुमारास वाहनचालकांची कसून चौकशी केली जात असून, ठोस कारण आढळून आले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाते. गत दोन दिवसात या मोहिमेदरम्यान ५१३ जणांनी दवाखाना, मेडिकलचे खोटे कारण देत कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. दवाखाना, मेडिकलच्या कागदपत्रांची मागणी करीत पोलिसांनी त्यांचा हा खोटारडेपणा हाणून पाडला. जवळपास ७३ हजारांचा दंड ठोठावला असून, अत्यावश्यक कारणाशिवााय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले.