काचा फुटल्या, खिडक्या तुटल्या; सांगा कसे रहावे कोविड सेंटरमध्ये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:31 AM2021-06-01T04:31:22+5:302021-06-01T04:31:22+5:30
संतोष वानखडे वाशिम : वाशिम शहरातील कोविड केअर सेंटर असलेल्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या असून, काचाही फुटल्या आहेत. पावसाळ्यात खोलीमध्ये ...
संतोष वानखडे
वाशिम : वाशिम शहरातील कोविड केअर सेंटर असलेल्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या असून, काचाही फुटल्या आहेत. पावसाळ्यात खोलीमध्ये पाणी येण्याचा धोका असून, यामुळे कोरोना रुग्णांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी इमारतींची डागडुजी करणे आवश्यक ठरत आहे.
पहिल्या लाटेत सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या जिल्ह्यातील निवासी शाळा व वसतिगृहाच्या इमारती कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आल्या. पहिली लाट ओसरल्यानंतर आपसूकच कोविड केअर सेंटरचे दरवाजेही कुलूपबंद झाले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने सवड (ता.रिसोड), सुरकंडी (ता.वाशिम), सिव्हिल लाईन वाशिम, मंगरूळपीर, कारंजा येथे कोविड केअर सेंटरचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. कोविड केअर सेंटरमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरची व्यवस्था नाही. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत अंधारातच रहावे लागते. सवड व सुरकंडी येथील कोविड केअर सेंटरच्या इमारती बऱ्यापैकी आहेत. मात्र, अन्य ठिकाणच्या इमारतींची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक ठरत आहे. वाशिम येथील सिव्हिल लाईनस्थित कोविड केअर सेंटरच्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या तर काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वादळवाऱ्यासह पाऊस आला तर थेट खोलीत पाणी शिरते. यामुळे रुग्णांची तारांबळ उडते. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जात असल्याने पावसाळ्यात इमारतींमध्ये पाणी शिरणार नाही, याची दक्षताही घेणे आवश्यक ठरत आहे.
०००००००००००
बॉक्स..
ग्रामीण भागातही स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे !
कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामीण भागात सद्यस्थितीत २३१ ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी खासगी व जिल्हा परिषद शाळांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मात्र, काही इमारती सुसज्ज नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात या इमारतींमध्ये रुग्णांनी राहणे कितपत सुरक्षित ठरेल, याबाबत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे, असा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे.
००००००
आठ कोविड सेंटरमध्ये २०० रुग्ण
जिल्ह्यात आठ कोविड केअर सेंटर आहेत. सध्या या कोविड सेंटरमध्ये २०० रुग्ण दाखल असून, पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून इमारती सुसज्ज ठेवणे आवश्यक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोविड केअर सेंटरच्या इमारती आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेतलेल्या इमारतींची पाहणी करणे अपेक्षित आहे.
०००००००
एकूण कोरोनाबाधित रुग्ण - ४००६३
एकूण सक्रिय रुग्ण - २१५८
एकूण कोविड केअर सेंटर - ०८
कोविड सेंटरमधील एकूण रुग्ण - २००
000
इमारतींची दुरूस्ती केली जाईल !
पावसाळ्यात कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून इमारतींची डागडुजी, दुरूस्ती केली जाईल. तुटलेल्या खिडक्या, फुटलेल्या काचा बदलण्यात येतील, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले.