कोरोना लसीकरणाविषयी घरोघरी जाऊन माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:41 AM2021-03-21T04:41:01+5:302021-03-21T04:41:01+5:30
वाशिम : जिल्ह्यात ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक ...
वाशिम : जिल्ह्यात ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत असून याबाबतची माहिती लसीकरणास पात्र व्यक्तींना घरोघरी जाऊन द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. दुरदृष्य प्रणालीद्वारे २० मार्च रोजी आयोजित सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोरोना लसीकरण, कोरोना चाचण्याविषयी करण्यात येत असलेले प्रयत्न, त्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी म्हणाले, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देऊन त्यांना कोरोना संसर्गापासून सुरक्षा देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शासकीय लसीकरण केंद्र सुरु आहे. या सर्व केंद्रांवरील लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. याकरिता शहरी व ग्रामीण भागातील जनजागृतीवर विशेष भर द्यावा.
ग्रामीण भागामध्ये लसीकरणास पात्र व्यक्तींच्या गावनिहाय याद्या तयार करून आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन त्यांना लसीकरणाचे महत्व सांगून लस घेण्याचे आवाहन करावे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात फ्लेक्स, पोस्टर लावून, दवंडी देवून लसीकरणाबाबत माहिती देण्याचे नियोजन संबंधित गट विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांनी करावे. प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्या कार्यक्षेत्रातील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार काम करावे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या मोहिमेची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. तसेच गेल्या सात दिवसांत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय यंत्रणांनी चांगले काम केले असून कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सुद्धा असेच प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते म्हणाले, प्रत्येक गावामध्ये दवंडीच्या माध्यमातून लोकांना लसीकरणाविषयी माहिती द्यावी. तसेच गावातील मुख्य चौक अथवा ठिकाणी पोस्टर लावून जनजागृती करावी. या कामामध्ये संबंधित गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना सुद्धा सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.