गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला चेतन उचितकरचा सन्मान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:38 AM2017-07-31T01:38:06+5:302017-07-31T01:38:09+5:30
वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील रहिवासी असलेला तसेच नेत्रहीन असताना विविध विषयांवर प्रखरतेने प्रबोधन करणारा चेतन पांडुरंग उचितकर या चिमुकल्याचा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी सन्मान केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील रहिवासी असलेला तसेच नेत्रहीन असताना विविध विषयांवर प्रखरतेने प्रबोधन करणारा चेतन पांडुरंग उचितकर या चिमुकल्याचा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी सन्मान केला. व्याख्यान व संगीत कलेच्या माध्यमाने कमी वयात मोठी कामगिरी करून छोट्या चेतनने अशक्य ते शक्य करून दाखविले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
गोवा येथील गोवा सक्षम या सामाजिक संस्थेच्यावतीने गोवा राज्यात मोतीबिंदू अंधत्व मुक्ती भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अभियानाचे राष्ट्रीय कार्यकारिणी समिती सदस्य शिरीष दारव्हेकर यांच्यासह गोवा सक्षमचे अध्यक्ष संतोष कामत, जयंत धोंड, प्रकाश लोटलीकर, अक्षय प्रभू आदिंची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या वक्तृत्व शैलीतून व्याख्यान आणि प्रबोधनाद्वारे नेत्रदान, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रात कमी वयात प्रभावी ठसा उमटविणारा व डोळसांनाही लाजविणारा हा चिमुकला चेतन नव्हे तर छोटा चेतन होय, असे मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले. भव्य स्वरूपातील या सोहळ्यात अंधांसाठी भरीव कार्य करणाºया अडीच हजार सदस्यांनी सहभाग घेतला होता.