मालेगाव तालुक्यात १ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By admin | Published: June 25, 2017 06:54 PM2017-06-25T18:54:46+5:302017-06-25T18:54:46+5:30
येत्या १ ते ७ जुलैदरम्यान मालेगाव तालुक्यात १ लाख २ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
शासनाचा उपक्रम: सामाजिक संघटनांसह जनतेला सहभागी होण्याचे आवाहन
मालेगाव : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण, तसेच विविध शासकीय कार्यालयाच्यावतीने येत्या १ ते ७ जुलैदरम्यान मालेगाव तालुक्यात १ लाख २ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार राजेश वजीरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर वनस्कर यांनी केले आहे.
यावर्षी महाराष्ट्रामध्ये ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. हा राज्यशासनाचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. वृक्ष लागवडीचे जिल्हावार नियोजन करण्यात आले असून, या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ५ लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी मालेगाव तालुक्यात वनविभागाच्यावतीने २७ हजार ७७५, तर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पंचायत समिती ७ हजार तसेच प्रती ग्रामपंचायतला ७०० वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींमध्ये मिळून एकूण ५८ हजार ८०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मालेगाव नगर पंचायतला १०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेंटलाही लागवडीसाठी वृक्ष देण्यात येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी यांना ७ हजार वृक्षाचे उद्दिष्ट आहे. ही वृक्ष लागवड १ जुलै ते ७ जुलै या सप्ताहामध्ये करण्यात येणार असून त्यासाठी सर्व नागरिक तथा विद्यार्थी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजेश वजीरे व वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर राऊत यांनी केले आहे.