साधेपणाने साजरी करता येणार बकरी ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:54+5:302021-07-18T04:28:54+5:30
वाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ अन्वये वाशिम जिल्ह्यात बकरी ...
वाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ अन्वये वाशिम जिल्ह्यात बकरी ईद-२०२१ च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार साधेपणाने बकरी ईद साजरी करता येणार असून, नियमात कोणतीही शिथिलता नाही नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १५ जुलै रोजी याबाबतचे आदेश जारी केले.
या आदेशात म्हटले आहे की, कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी बकरी ईदची नमाज मशीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असलेले जनावरांचे बाजार बंद राहतील. जनावरे खरेदी करावयाची असल्यास नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीने किंवा दूरध्वनीद्वारे जनावरे खरेदी करावीत. शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.
०००
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये
बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासना यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.