मानवी जीवनात सत्कर्म सर्वश्रेष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:40 AM2021-02-10T04:40:42+5:302021-02-10T04:40:42+5:30
श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन ...
श्री संत निवृतिनाथ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काजळेश्वर येथे तीन दिवसीय प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पहिले हरिकीर्तन करताना गोपाल महाराजांनी कर्मयोग, प्रारब्ध आणि संचित यावर भाष्य करताना मानवी जीवनात कर्माचे महत्त्व विशद केले. कर्म दोन प्रकारचे आहेत. चांगले आणि वाईट. जसे पेराल, तसेच उगवेल, जसे कर्म कराल, तसेच त्याचे फळ असेल, असे भाविकांना पटवून देताना काही कर्मांचे फळ लगेच मिळते, काही कर्मांचे फळ उशिरा, तर काही कर्माचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे विस्तवाला हात लागला तर चटका ताबडतोब लागतो. अपराध, गुन्हा केला, तर त्याचे फळ काही दिवसांनी मिळते. बँकेत अनामत रक्कम ठेवली, तर दामदुप्पट काही वर्षांनी मिळते, तसेच काही कर्मांचे फळ दुसऱ्या जन्मात मिळते. जसे भीष्माचार्य शरशय्येवर सहा महिने होते. भगवान कृष्णांनी केलेल्या आदेशानुसार हे त्यांना मिळालेले मागील जन्माच्या कर्माचे फळ होते. म्हणजेच कर्माचे फळ मिळतेच. म्हणूनच मानवी जीवनात चांगलेच कर्म करावे म्हणजे मानवी जीवन सफल होईल. चांगले कर्म करा, कष्ट करा, मेहनत करा म्हणजे जीवन सफल होईल, परमेश्वर चांगल्या कर्मात साथ देईल, असे मौलिक विचार गोपाल महाराजांनी उपस्थित भाविकांसमोर मांडले. संस्थानकडून शरद महाराज गोरले आणि गोपाल महाराज यांचा संदीप उपाध्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.