गुड मॉर्निंग पथकाचे गठण; पहिल्याच दिवशी तीन लोटाबहाद्दर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:39 PM2018-08-20T16:39:21+5:302018-08-20T16:41:16+5:30
वाशिम - उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आले असून, पहिल्या दिवशी अर्थात २० आॅगस्ट रोजी मालेगाव तालुक्यात भेटी देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आले असून, पहिल्या दिवशी अर्थात २० आॅगस्ट रोजी मालेगाव तालुक्यात भेटी देण्यात आल्या. एरंडा येथे तीन लोटाबहाद्दरांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झाला असला तरी उघड्यावरील शौचवारी थांबता थांबेना, असेच काहीसे चित्र दिसून येते. शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याची बाब निदर्शनात आली होती. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी गुड मॉर्निंग पथक गठीत करून गावोगावी भेटी देण्याचे निर्देश जिल्हा स्वच्छता कक्षाला दिले. त्या ंअनुषंगाने जिल्हा स्वच्छता कक्षाने गुड मॉर्निंग पथक गठीत केले असून, २० आॅगस्ट रोजी मालेगाव तालुक्यातील एरंडा येथे सकाळी ६ वाजताच्या सुमारास भेट देण्यात आली. यावेळी तीन जण उघड्यावर शौचास जात असताना आढळून आले. तिघांनाही किन्हीराजा पोलीस चौकीत जमा केले. त्यांच्याविरूद्ध मुंबई पोलीस अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी काळे यांना देण्यात आले. या पथकामध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, प्रफुल्ल काळे आणि राम श्रृंगारे यांचा समावेश होता.