हजारो नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचलीच नाही प्रशासकीय यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 02:15 PM2019-11-05T14:15:16+5:302019-11-05T14:15:24+5:30
अनेक नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकली नसल्याची वस्तूस्थिती आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवेळी कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवली. त्यात हजारो हेक्टरवरील खरीपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, ४ नोव्हेंबरअखेर ७१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. असे असले तरी अनेक गावांमधील शेतशिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचून असल्याने अद्यापपर्यंत हजारो नुकसानग्रस्तांच्या बांधावर प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकली नसल्याची वस्तूस्थिती आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर सातत्याने कोसळलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांनी महत्प्रयासाने पिकविलेले सोयाबिन सोंगून त्याच्या सुड्या रचल्या; मात्र अशातच अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबिनच्या सुड्या पूर्णत: ओल्या होऊन त्यास चक्क कोंब फुटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. मानोरा, मंगरूळपीर आणि कारंजा या तालुक्यांमध्ये सोयाबिनसोबतच नगदी व हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते. यंदा मात्र कपाशी ऐन बहरात असतानाच पावसाच्या दणक्याने कपाशीचे बोंडे काळे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास वातावरणात निर्माण होत असलेल्या धुक्यामुळे हळद या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन हे पिकही शेतकºयांच्या हातातून निसटत चालल्याचे एकंदरित चित्र आहे.
दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव ही तीन धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने त्यातील पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने या नदीला महापूर येऊन रिसोड तालुक्यातील अनेक गावांमधील शेती व त्यातील उभी पिके, सोयाबिनच्या सुड्यांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, शासनाच्या आदेशावरून महसूल विभाग व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनाम्यांची कामे तातडीने हाती घेतली आहेत; मात्र नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या कितीतरी पटीने अधिक असताना त्यातुलनेत प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसणे आणि अनेक गावांमधील शेतात मोठ्या प्रमाणात चिखल साचून असल्याचा फटका नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनामा प्रक्रियेस बसत आहे. यामुळे आजही (४ नोव्हेंबर) अनेक नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकली नसल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे केव्हा होणार, त्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्यशासनाकडे कधी सादर होणार आणि झालेल्या नुकसानापोटी अर्थसहाय्य नेमके कधी मिळणार, आदी प्रश्नांनी शेतकºयांना घेरले आहे.
जिल्ह्यात अवेळी कोसळलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे काम महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने केले जात आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने ७१ हजार शेतकºयांच्या शेतातील नुकसानाचे पंचनामे पूर्ण केले असून उर्वरित शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. जिल्ह्यातील काहीठिकाणी शेतशिवारांमध्ये पाणी साचून असल्याने नुकसानाचे सर्वेक्षण व पंचनामे प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहे. अशाही बिकट स्थितीत प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी राबत आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी
वाशिम