वाशिम जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी संपावर; प्रशासन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:48 PM2018-08-07T13:48:47+5:302018-08-07T13:49:54+5:30
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाºयांनी संपाला पाठिंबा म्हणून काळ्याफिती लावून कामकाज केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत सुरू असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.
गत दोन वर्षांपासून कर्मचाºयांच्या मागण्यांसदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला नाही. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे आदी मागण्या शासनस्तरावर वेळोवेळी करण्यात आल्या. मात्र, याकडे शासनाने अद्याप लक्ष दिले नाही. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७, ८ व ९ आॅगस्ट दरम्यान राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. ७ आॅगस्ट रोजी या संपात जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्वच अर्थात ३७८ कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी केला. कर्मचारी संपावर असल्याने महसूलविषयक कामकाज ठप्प पडले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कामकाजावरही या संपाचा परिणाम जाणवला.
या संपात मंडळ अधिकारी व तलाठी सहभागी नाहीत, असे तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जवळपास २२०० ते २३०० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प पडले. दोन शिक्षक संघटना संपात सहभागी असल्याने जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद तर काही शाळा सुरू होत्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या कर्मचाºयांनी या संपाला पाठिंबा म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. मेहकरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांतील परिचारिका या संपात सहभागी असल्याने आरोग्य सेवेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका वगळता अन्य कुणीही संपात सहभागी नसल्याने आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे, असा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी केला. जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालय, नगर परिषदेचे कर्मचारीही या संपात सहभागी असल्याने कार्यालयांत शुकशुकाट दिसत आहे.