आर्थिक मदतीसाठी लोककलावंतांचे शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:46+5:302021-07-16T04:27:46+5:30
२२ मार्च २०२० पासून कोरोना विषाणू महामारीमुळे देशावर संकट कोसळले असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात टाळेबंदी लागू ...
२२ मार्च २०२० पासून कोरोना विषाणू महामारीमुळे देशावर संकट कोसळले असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे कलावंतांवरदेखील उपासमारीची वेळ आली. पहिली लाट ओसरल्यानंतर अनलॉकचे टप्पे सुरू झाले. परंतु, कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णत: बंद पडल्यामुळे कलावंतांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोना महामारीमुळे शासन, प्रशासनाकडून वेळोवेळी निर्बंध लावले जात असल्यामुळे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम कलावंतांची माहिती व यादी आर्थिक मदत मिळण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सास्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी १० मार्च २०२१ रोजी ऑनलाईन बैठक घेऊन कलावंतांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी लोककलावंतांनी केली.
००००
प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे!
मालेगाव तालुक्यातील लोककलावंतांना शासनाकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती, शाखा मालेगावच्यावतीने निवेदनाद्वारे केली. तात्काळ आर्थिक मदत मिळाली नाही, तर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही कलावंत न्याय हक्क समितीने दिला.