सरकार शाळा वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचा निर्धार!
By संतोष वानखडे | Published: May 19, 2024 05:37 PM2024-05-19T17:37:49+5:302024-05-19T17:38:04+5:30
शाळा बचाव समितीची बैठक : ग्रामसभांचे ठराव घेणार
वाशिम : पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करणे, समूळ शाळेच्या माध्यमातून समायोजन करणे आदी प्रकाराला विरोध करीत सर्व सरकारी शाळा वाचविण्यासाठी जिल्ह्यात लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार रविवारी (दि.१९) वाशिम येथे पार पडलेल्या शाळा बचाव समितीच्या बैठकीत करण्यात आला. स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे पार पडलेल्या बैठकीला शिक्षण बचाव समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निमंत्रक रमेश बीजेकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी डॉ. रवी जाधव, गजानन धामणे, प्रल्हाद पौळकर, रामचंद्र वाढे, भागवत मोहिरे, प्रशांत देशमुख, महेंद्र खडसे, रामदास आरू, अजय सोनुनकर, जगदेव राऊत, राहुल भगत, प्रमोदकुमार राऊत, राम शृंगारे, मधुकर महाले, निलेश राठोड, सुगत तायडे, ज्ञानेश्वर गवळी, नागेश काळे, रितेश राऊत, दत्तात्रय राजगुरू आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारने २०२० ला लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी देश पातळीवर केली जात आहे. राज्य सरकारकडून याची अंमलबजावणी करताना समूह शाळेच्या माध्यमातून समायोजनेच्या नावाखाली कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांना कायमचे टाळे ठोकले जात असल्याचा आरोप यावेळी रमेश बिजेकर यांच्यासह मान्यवरांनी केला. शाळा बचाव समितीच्या माध्यमातून शाळा बंद होणाऱ्या गावांमध्ये प्रबोधन करून बंद होणाऱ्या शाळांना वाचविण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घेण्यात येणार आहेत. ते ठराव शासनाला पाठविले जाणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.मंगेश भुताडे यांनी तर प्रास्ताविक गजानन धामणे यांनी केले.
गावोगावी प्रबोधन करणार
वाशिम जिल्ह्यातील कमी पटसंख्या असणाऱ्या १५० पेक्षा अधिक सरकारी शाळांना वाचविण्यासाठी शाळा बचाव समितीकडून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे. संबंधित गावांना भेटी देऊन त्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तसेच शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शाळा बचाव समितीचे प्रभावी संघटन बांधण्यासाठी अध्यक्ष मंडळ, सचिव मंडळ, कार्यकारी मंडळ या माध्यमातून पदनिर्मिती करून शाळा वाचविण्यासाठी लोकचळवळीला बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.