शासकीय कार्यालये सुरू; पण अभ्यांगतांना प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:43 AM2021-06-02T11:43:39+5:302021-06-02T11:43:44+5:30
Washim News : प्रवेश बंद असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मंगळवारी खाली हात परतावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कडक निर्बंधात शिथिलता मिळताच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची शासकीय कार्यालये आता २५ टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू झाली आहेत; मात्र अभ्यांगतांना प्रवेश बंद असल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मंगळवारी खाली हात परतावे लागले.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या कालावधीत आरोग्य व अत्यावश्यक बाबीशी निगडीत शासकीय कार्यालये सुरू ठेवण्यास मुभा, तर अन्य शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. निर्बंधात शिथिलता मिळाल्यानंतर अन्य शासकीय कार्यालयेदेखील २५ टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू करण्यात आली. महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, महावितरण सेवा, कोषागार कार्यालये, पाणीपुरवठा विभाग इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्याच्या कार्यालयीन वेळेत २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाली. सर्व शासकीय कार्यालये अभ्यांगतांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आली. शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता पीक कर्ज विहित वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व बँक तसेच पतसंस्था, एलआयसी ऑफिस, पोस्टऑफिस यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित ठेवण्यास मुभा असल्याने पहिल्या दिवशी या कार्यालयात नागरिक कामानिमित्त आले.