तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे शासकीय कार्यालये नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:51 PM2020-12-08T15:51:11+5:302020-12-08T15:51:25+5:30
Manora News कुलूपबंद असल्याने ही कार्यालये केवळ नावालाच दिसून येत आहेत.
मानोरा : देशातील जागृत आणि ख्यातीप्राप्त तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या विभागाची शासकीय कार्यालये कुलूपबंद असल्याने ही कार्यालये केवळ नावालाच दिसून येत आहेत.
पोहरादेवी आणि परिसरातील तब्बल चोवीस गावांना सुरळीत वीजपुरवठा होऊन शेतकरी आणि सामान्य नागरिकांना शेतीसाठी आणि घरगुती उपयोगासाठी अखंड वीज उपलब्ध करून देणाऱ्या कार्यालयात नेहमी अस्थायी कर्मचारीच हजर दिसून येताे. येथे येणारे ग्राहक कामानिमित्त आल्यानंतर येथे नियुक्त असलेल्या वीज अभियंत्यांशी संपर्क केला असता अभियंता दूरध्वनी उचलण्याचे सौजन्यही दाखवित नसल्याचे ग्राहकांत बाेलले जाते. सर्वसामान्य नागरिक आणि पोहरादेवी व परिसरातील गुराढोरांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी असणारे आरोग्य उपकेंद्र आणि पशुधन विकास अधिकारी यांचा दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी बंद असताे. या ठिकाणी गृह विभागाकडून दूरक्षेत्राचे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. पोलीस दूरक्षेत्र मात्र बहुदा बंद स्थितीत दिसून येते. याकडे वरिष्ठांचेही मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.